मुंबई–गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील बुर्डी गावाजवळ गुरुवारी (दि. ६ मार्च) सायंकाळी भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. सायंकाळी सुमारे ७.३५ वाजण्याच्या सुमारास बुर्डी बसस्टॉपसमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लाल रंगाची ब्रेझा कार (क्र. MH 06 BU 4664) चालकाने आपली कार अतिवेगाने व बेदरकारपणे चालवित गोवा दिशेकडील लेनवरून जात असताना एल अँड टी कॉलनी, सालिंदे येथून बुर्डी गावाकडे रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात प्रदीप कुमार साहब सिंग (वय ३३) व अजय कुमार रामप्रकाश (वय ३१) सध्या रा. एल अँड टी कॉलनी सालींदे, ता. पेण, मुळ रा.फिरोजाबाद उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती आहे. या दोघांच्या डोक्याला तसेच हातपायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तक्रारदार सुनील शंकर पाटील (पोलीस पाटील, सालींदे) यांच्या फिर्यादीवरून वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळी न थांबता कोणतीही माहिती न देता पळ काढला परंतु दोन तासाच्या आता पोलिसांनी त्याला कारसह ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनावळे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.