पनवेल बाजारपेठेला वाहतूक कोंडीचा विळखा? वाहतूक पोलिस रस्त्यावर, महापालिका कुठे?

पनवेल | प्रतिनिधी 
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. नागरिकांनी रस्त्यावर वाहने न उभी करता प्रशासनाने निश्चित केलेल्या वाहनतळांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, रस्त्याकडेला फुले व पालेभाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही शुक्रवारी वाहतूक पोलिसांनाच रस्त्यावर उतरून कारवाई करावी लागली.
फडके नाट्यगृहासमोरील मराठी शाळा, नवीन तहसील कार्यालय, टपाल नाका परिसर, कर्नाळा सर्कल, लाईन आळी रोड तसेच डी.एड. कॉलेजसमोरील मोकळ्या जागा वाहनतळासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी अद्याप स्वच्छता न झाल्याने वाहनतळ प्रत्यक्षात कधी उपलब्ध होणार, असा सवाल नागरिकांकडून होत आहे.
गर्दीनुसार एकेरी वाहतूक, सम-विषम पार्किंग आणि बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. उरण नाका ते टपाल नाका परिसरातील व्यापाऱ्यांसाठी माल चढ-उताराची वेळ दुपारी १ ते ४ अशी निश्चित करण्यात आली आहे.
अतिक्रमणांवर महापालिकेची उदासीनता?
बाजारपेठेतील रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे, कचरा आणि रस्त्याकडेला ठेवलेले साहित्य हटविण्याची मागणी होत आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर ही बाब अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना पथक पाठवून कारवाईचे आदेश दिले. गणेशोत्सव बंदोबस्तासाठी वाहतूक शाखेचे ७० कर्मचारी व सात अधिकारी तैनात करण्यात आले असून, अतिरिक्त ५० वॉर्डनची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे.
उरण नाका ते टपाल नाका मार्गावर रिक्षा व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. तसेच फुल मार्केट परिसरातील काही मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. फूल व पालेभाजी विक्रेत्यांसाठीही पर्यायी जागा निश्चित करण्यात आली आहे. “नागरिकांनी निश्चित पार्किंगचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे,” असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी केले.
महापालिकेने वेळेत अतिक्रमणे हटवून वाहनतळ उपलब्ध न केल्यास वाहतूक नियोजन कागदावरच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.