पंढरपूर तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट; ४१५० कोटींचा भव्य विकास आराखडा मंजूर

पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी ४१५० कोटींचा भव्य विकास आराखडा मंजूर
मुंबई |
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी ४१५०.४६ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. राज्यातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी आधुनिक व दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करून ही विकासकामे येत्या ३० महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गणेश नाईक, जयकुमार गोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरवर्षी आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी वारीत लाखो वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणींच्या दर्शनासाठी येत असल्याने वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक, रस्ते व सुविधा यांचा समन्वित विकास करण्यावर भर देण्यात आला आहे.
प्रस्तावानुसार गर्दी व्यवस्थापनासाठी कॉरिडॉर, मंदिर व मठांचे जतन, नदी घाट सुशोभीकरण, वाहनतळ, व्यापारी संकुल, तसेच पालखी तळांचा विकास यांचा समावेश आहे. याशिवाय भूसंपादन, पुनर्वसन आणि बाधितांना योग्य मोबदला देण्यासाठी मोठा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि समाधानकारक अनुभव मिळावा, यासाठी सर्व कामे शाश्वत आणि भविष्याभिमुख पद्धतीने राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या.