जिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल असताना त्यांच्या नातेवाईकांना रात्री मुक्कामासाठी योग्य व्यवस्था नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. रुग्णांच्या सेवेसाठी थांबलेल्या नातेवाईकांना झोपण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्याने अखेर काहींना रिक्षाचा आधार घ्यावा लागल्याची घटना घडली.
रुग्णालयाच्या आवारातच उभी असलेली रिक्षा हीच झोपेची सोय ठरल्याचे पाहायला मिळाले. थकलेल्या अवस्थेत नातेवाईकांनी रिक्षेमध्येच रात्र काढली. यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या सोयी-सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतीक्षागृह, विश्रांती कक्ष किंवा झोपण्याची मूलभूत व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः बाहेरगावाहून आलेल्या लोकांची अडचण अधिकच वाढते.
या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नातेवाईकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.