म्हसळा तालुक्यातील मेंदडी–खरसई हमरस्त्यावर अल्पावधीत दोन वेगवेगळे अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या घटनेत पर्यटकांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. या घटनांमुळे संबंधित रस्ता आणि विशेषतः धोकादायक वळणांबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिला अपघात मेंदडी येथील तीव्र वळणावर घडला. पल्सर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सुमन नामदेव शिवणे (वय 42, रा. नानवली) या आपल्या भाचा शैलेश हांडे (30) यांच्यासोबत वडवली येथून म्हसळा मार्गे मुंबईकडे निघाल्या होत्या. दरम्यान, तीव्र वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात सुमन शिवणे गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने म्हसळा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या वळणावर गेल्या पाच महिन्यांत किमान पाच गंभीर अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे हे वळण अत्यंत धोकादायक बनले असून, येथे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, दुसरा अपघात खरसई गावाजवळ घडला. पर्यटकांची एक भरधाव कार ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याबाहेर जाऊन थेट शेतात घुसले. या अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पर्यटकांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या दोन्ही घटनांमुळे मेंदडी–खरसई मार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने या मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा-जसे की वळणांवर संकेतफलक, स्पीड ब्रेकर, रस्त्याचे रुंदीकरण किंवा संरक्षण भिंती-त्वरित कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दोन्ही अपघातांची नोंद म्हसळा पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.