नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रायगड स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि नेरळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित मिश्रित तंबाखू व पानमसाल्याचा साठा जप्त केला. मंगळवारी सकाळी करण्यात आलेल्या कारवाईत कृष्णा राधेश्याम गुप्ता (३३) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या घरातून सुमारे २४ हजार २१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एलसीबी आणि नेरळ पोलिसांच्या पथकाने सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गुप्ता याच्या राहत्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान विमल गुटखा, सुगंधित मिश्रित तंबाखू आणि पानमसाल्याचा प्रतिबंधित साठा आढळून आला. पोलिसांनी याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत जप्त मुद्देमालाचा पंचनामा केला.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत महादेव शिंदे यांच्या तक्रारीवरून नेरळ पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास नेरळ पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.