जमीन खरेदीसाठी पैशांचा तगादा; विवाहितेची आत्महत्या, अलिबागमध्ये हुंड्यासाठी छळाचा आरोप, पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

अलिबागमध्ये हुंड्यासाठी छळाचा आरोप
अलिबाग | अमुलकुमार जैन
जमीन खरेदीसाठी माहेराहून पैसे आणावेत, या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. उर्मिला प्रद्युम्न गुप्ता (२७) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती प्रद्युम्न जोखन गुप्ता, सासरे जोखन राघू गुप्ता आणि सासू मंजू जोखन गुप्ता यांच्याविरुद्ध अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उर्मिला हिचा २०२५ मध्ये प्रद्युम्न गुप्ता याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहावेळी सहा लाख रुपये हुंडा, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि एक तोळ्याची सोन्याची साखळी देण्याचे ठरले होते. त्यापैकी काही रक्कम विवाहापूर्वी सासऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आली होती. मात्र, उर्वरित रकमेवरून पती, सासू-सासरे उर्मिला हिला टोमणे मारून मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप आहे. तसेच अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यासाठी माहेराहून आणखी पैसे आणण्याचा दबाव तिच्यावर टाकला जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मार्च २०२६ ते १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विद्यानगर, साईनगर येथील समीक्षा सदन निवासस्थानी हा छळ सुरू असल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून उर्मिला हिने आत्महत्या केल्याचे तिचा भाऊ दीपक कुमार गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०८ व ८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अलिबाग पोलिस करीत आहेत.