नागोठण्यात दहीहंडीचा थरार; जय हनुमान व जय बापदेव गोविंदा पथकांची बाजी

नागोठण्यात दहीहंडीचा थरार
नागोठणे | महेंद्र माने 
 नागोठणे नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात किशोरभाई जैन मित्र मंडळाच्या वतीने आयोजित ‘गोविंदा गोपाल काला उत्सव २०२६’ तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर पुरस्कृत नागोठणे विभाग शिवसेना-युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भव्य दहीहंडी महोत्सव २०२६ उत्साहात पार पडला. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या दोन्ही दहीहंडी उत्सवांमध्ये गोविंदा पथकांनी थरारक सलामी देत उपस्थितांची मने जिंकली.
किशोरभाई जैन मित्र मंडळाच्या उत्सवात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, सरपंच सुप्रिया महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब टके, शिवराम शिंदे, नरेंद्र जैन, प्रकाश जैन, विलास चौलकर, संजय भोसले, संजय महाडिक, उत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. रमेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत सुमारे २० गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. यामध्ये १७ पुरुष पथकांनी पाच थर, तर तीन महिला पथकांनी चार थरांची सलामी दिली. सर्व सहभागी पथकांना प्रत्येकी २,५२५ रुपये रोख पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. सात थर रचणाऱ्या आमडोशी येथील जय हनुमान गोविंदा पथकाने विजेतेपद पटकावत ५५,५५५ रुपयांचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक मिळवला. दहीहंडी फोडण्याचा मानही जय हनुमान पथकाला मिळाला.
——————————————
दरम्यान, प्रसाद भोईर पुरस्कृत शिवसेना-युवासेना दहीहंडी महोत्सवातही मोठा उत्साह पाहायला मिळाला. या स्पर्धेत सुमारे २१ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. १८ पुरुष पथकांनी पाच थर, तर तीन महिला पथकांनी चार थरांची सलामी दिली. सहभागी सर्व पथकांना प्रत्येकी २,५२५ रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत आमडोशी येथील जय हनुमान गोविंदा पथक आणि वणी येथील जय बापदेव गोविंदा पथक यांनी सात थर रचत विजेतेपद पटकावले. दोन्ही विजेत्या पथकांना मिळणारी ५५,५५५ रुपयांची रोख रक्कम विभागून देण्यात आली. चिठ्ठी काढल्यानंतर दहीहंडी फोडण्याचा मान जय बापदेव गोविंदा पथकाला देण्यात आला.
या महोत्सवाला शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, रायगड जिल्हा महिला संघटिका दर्शना जवके, ग्रामपंचायत सदस्या ज्योती राऊत, विभागप्रमुख प्रकाश मेस्त्री, शाखाप्रमुख राजेश सुर्वे, प्रशांत भोईर, दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश भोय, कार्याध्यक्ष इम्रान पानसरे, कीर्तिकुमार कळस आदी मान्यवर उपस्थित होते.
——————————————
दोन्ही उत्सवांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसह गोविंदा पथकांच्या थरारक कामगिरीचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला. उत्सव यशस्वी करण्यासाठी दोन्ही मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.