अलिबाग तालुक्यातील भाकरवड येथे शनिवारी, ५ सप्टेंबर २०२६ रोजी गोविंदाच्या निमित्ताने प्रथमच महिलांच्या दहीहंडीचा थरार ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला. विघ्नेश रमेश पाटील मित्रमंडळाच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला.
दहीहंडी फोडण्यासाठी गावातील ३५ हून अधिक महिलांनी सलग आठ दिवस दररोज सायंकाळी सात वाजता सराव केला. महिला गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी देण्याचा निर्धार केला होता. अथक सरावानंतर महिलांनी पाच थरांची सलामी यशस्वीपणे देत दहीहंडी फोडली. महिलांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी विघ्नेश पाटील मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी फोडणाऱ्या महिला पथकाला पाच हजार रुपयांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ग्रामस्थ मंडळ भाकरवडचे अध्यक्ष शंकर पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
“गावातील होतकरू महिलांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच आत्मीयता, जोश आणि एकरूपतेतून सर्वांनी एकत्र यावे,” या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे विघ्नेश पाटील मित्रमंडळाच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे ८०० हून अधिक ग्रामस्थ, महिला आणि तरुण उपस्थित होते. महिलांनी सादर केलेल्या दहीहंडीच्या थरांनी उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, भाकरवड गावात नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ग्रामस्थ, महिला आणि तरुण एकत्र येऊन कोणाकडूनही देणगी न घेता अध्यक्ष शंकर पाटील यांच्या माध्यमातून तसेच दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने नऊ रात्री आणि नऊ दिवस संपूर्ण गावासाठी महाप्रसादाची व्यवस्था करतात. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.
गावात नियमित हरिपाठ आणि भजनाचे आयोजन केले जाते. त्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विविध सण-उत्सवही ग्रामस्थांच्या एकजुटीने उत्साहात साजरे केले जातात. याच परंपरेचा एक भाग म्हणून विघ्नेश पाटील मित्रमंडळाने आयोजित केलेल्या महिलांच्या दहीहंडी उपक्रमाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.