गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छता, आरोग्य जनजागृती आणि उत्सवाची आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे यांनी केले. पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत हे निर्देश देण्यात आले. बैठकीला उपसभापती भाई शिंदे, गटविकास अधिकारी संदीप कराड तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
पंचायत समितीच्या ‘निरोगी व स्वच्छ गणेशोत्सव’ उपक्रमांतर्गत गणेशोत्सवापूर्वी सर्व गावांमध्ये रस्ते, चौक, मंदिरे, मंडप परिसर, नाले-गटारे यांची स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, विसर्जन घाटांची स्वच्छता व दुरुस्ती करणे तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या.
डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेऊन पाणी साचणारी ठिकाणे तातडीने हटविणे, टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक वस्तू, डबे व कुंड्यांमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे आणि आठवड्यातून किमान एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरभेटी घेऊन जनजागृती करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक ठिकाणी माहितीपत्रके व जनजागृती फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रत्येक ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचा छायाचित्रांसह अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावा, असेही सांगण्यात आले.
गणेश विसर्जनाच्या काळात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन विसर्जन घाटांची पूर्वपाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य, डेंग्यू प्रतिबंध आणि विसर्जन घाटांची सुरक्षितता यामध्ये कोणतीही हयगय होऊ नये, यावर पंचायत समितीने विशेष भर दिला.
दरम्यान, या महत्त्वाच्या बैठकीला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित असले तरी ४० सरपंचांपैकी केवळ दोनच सरपंच उपस्थित राहिल्याने त्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.