नागोठणे एस.टी. बस स्थानक पुनर्विकासाचे भूमिपूजन संपन्न; स्थानिकांनाच गाळे देण्याची ना. अदिती तटकरे यांची सूचना

Nagothane st sthanak bhumipoojan
नागोठणे | महेंद्र माने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड विभागांतर्गत नागोठणे बस स्थानकाच्या पुनर्विकास कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवार, 15 डिसेंबर रोजी सकाळी उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम ना. अदिती ताई तटकरे, ना. भरतशेठ गोगावले व आ. रविशेठ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी माजी जि.प. सदस्य किशोर जैन, नरेंद्र जैन, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच अकलाक पानसरे, तसेच शिवराम शिंदे, भाई टके, मनोजकुमार शिंदे, मारुती देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
भूमिपूजनानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ना. अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण सूचना करताना नव्याने उभारल्या जाणाऱ्या एस.टी. स्थानकातील व्यापारी/व्यावसायिक गाळे स्थानिक नागरीकांनाच देण्यात यावेत, असे स्पष्ट केले. नागोठणे स्थानकासाठी सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर आलेली स्थगिती दूर करून, परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून २.८० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
नागोठणे स्थानक दरवर्षी पुराच्या पाण्याखाली जात असल्याने रस्त्याच्या पातळीप्रमाणे उंची वाढविणे, संरक्षण भिंतीची योग्य रचना करणे, प्रवासी व नागरिकांची गैरसोय टाळणे, तसेच आराखड्यानुसार दर्जेदार काम करण्याच्या सूचना ना. तटकरे यांनी दिल्या. नागोठणे हे कोकणातील ऐतिहासिक व मध्यवर्ती स्थानक असल्याने बसफेऱ्या वाढविणे, नवीन बसेसचा प्रस्ताव पाठविणे आणि विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेनुसार वेळापत्रक आखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ना. भरतशेठ गोगावले म्हणाले की, तब्बल ५२ वर्षांनंतर या स्थानकाचे काम चांगल्या दर्जाचे होत असून, मंजूर निधी अपुरा पडल्यास नागोठणेकरांसाठी पैसे कमी पडू देणार नाहीत. हे काम पोलादापूर स्थानकाच्या धर्तीवर व्हावे, तसेच पुराचे पाणी व्यवस्थित वाहून जाईल अशी रचना करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दीड वर्षांत काम पूर्ण करून उद्घाटनासाठी ना. प्रताप सरनाईक यांच्यासह येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आ. रविशेठ पाटील यांनी सांगितले की, हे स्थानक गरीब व सर्वसामान्य जनतेसाठी असून, अनेक वर्षे रखडलेले काम आता मार्गी लागले आहे. काम करताना पुराच्या पाण्याचा अंदाज घेऊन उंची वाढविणे आणि उत्तम दर्जा राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण नागोठणे प्रथम नागरिक (सरपंच), ग्रामपंचायत व पत्रकारांना न दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत माजी सरपंच व विद्यमान ग्रा.प. सदस्य डॉ. मिलिंद धात्रक यांनी भर सभेत परिवहन विभागाचा निषेध नोंदविला. यावर विभागीय नियंत्रक डॉ. सुहास पार्टे यांनी प्रथम नागरिक, ग्रामपंचायत व पत्रकारांची जाहीर माफी मागून, अशी चूक पुन्हा होणार नाही, असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *