कामोठे उपनगरातील सेक्टर ९ परिसरात शनिवारी रात्री पूर्वीच्या वादातून दोन युवकांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव काकडे (२८) व फैजान मुलानी हे दोघे सेक्टर-६ येथील पानटपरीवर गेले असता तेथे समर्थ मोरे, प्रतीक साठे व आर्यन हे युवक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवीगाळीवरून पुन्हा वाद निर्माण झाला. यावेळी समर्थ मोरे याने गौरवकडे जाब विचारत दगड उचलला.
वाद वाढत असताना आर्यन याने चाकू काढून गौरवच्या उजव्या हातावर वार केला. गौरवला सोडविण्यासाठी फैजान पुढे आला असता तिघांनी मिळून त्याला लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर फैजानच्या छाती व पोटावर चाकूने वार करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.