नवी मुंबई पोलिसांच्या १५ अधिकारी-अंमलदारांना मानाची सेवा पदके; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचाही समावेश

#नवी मुंबई पोलिसांच्या १५ अधिकारी-अंमलदारांना मानाची सेवा पदके
पनवेल | प्रतिनिधी 
स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन, निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवेची दखल घेत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी मानाच्या सेवा पदकांची घोषणा केली.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील तब्बल १५ अधिकारी-अंमलदारांना अति-उत्कृष्ट, उत्कृष्ट आणि सी-६० सेवा पदके जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्यदिनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात झालेल्या ध्वजारोहण समारंभात पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते पदकप्राप्त १४ अधिकारी-अंमलदारांचा गौरव करण्यात आला.
अति-उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेशकुमार लक्ष्मीनारायण आंचलवार, पोलीस निरीक्षक प्रमोद भास्करराव तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक अंबादास रघुनाथ कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील रघुनाथ, रघुनाथ नलावडे, पोलीस हवालदार विनोद भुजंग नवले, विकास प्रभाकर साळवी आणि शिवलिंग पांडुरंग ठिगळे यांची निवड झाली आहे.
उत्कृष्ट सेवा पदकासाठी अभय आत्माराम सांगळे, समीर सुरेश पाटील आणि अर्चना जितेंद्र म्हात्रे यांचा, तर सी-६० सेवा पदकासाठी पृथ्वीराज अजितसिंग घोरपडे आणि तुकाराम सुरेश नांगरे यांचा समावेश आहे.
यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. जनतेच्या सुरक्षेसाठी अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हा गौरव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पदकप्राप्त अधिकारी-अंमलदारांसह त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करून त्यांनी पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, पोलीस उपआयुक्त प्रशांत मोहिते आणि एसआरपीएफचे कमांडंट संजय जाधव यांचाही मानाच्या सेवा पदकांच्या यादीत समावेश असून, त्यांचा सन्मान लवकरच करण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी-अंमलदारांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेचा हा गौरव दलाचे मनोबल वाढविणारा ठरला आहे.