पनवेल स्थानकात गॅस टँकरला गळती; प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविले

पनवेल स्थानकात गॅस टँकरला गळती
पनवेल | प्रतिनिधी 
 जेएनपीटीहून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू रेल्वेवरील एचपीसीएलच्या गॅस टँकरला पनवेल रेल्वे स्थानकात अचानक गळती लागल्याने काही काळ खळबळ उडाली. प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर मालगाडी आल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पनवेल अग्निशमन दल आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आवश्यक उपाययोजना केल्याने मोठी दुर्घटना टळली.
गॅस गळतीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक पाच तातडीने रिकामा करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पनवेल स्थानकाकडे येणाऱ्या काही गाड्या स्थानकाबाहेरच थांबविण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली, तर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षित अंतरावर ठेवून परिसरात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली.
दरम्यान, एचपीसीएलच्या तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तज्ज्ञांनी तातडीने उपाययोजना करून गॅस टँकरमधील गळतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. त्यानंतर रात्री सुमारे पावणेबाराच्या सुमारास मालगाडीला डिझेल इंजिन जोडून कळंबोली स्थानकाच्या दिशेने रवाना करण्यात आले. तेथे मालगाडी थांबवून टँकरच्या गळतीच्या दुरुस्तीचे अंतिम काम हाती घेण्यात आले. या घटनेचा लोकल रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून पनवेलहून धावणारी लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.