उद्योग क्षेत्राची प्रगती झाली तरच पोलादपूरचा सर्वांगीण विकास : आ. प्रवीण दरेकर

पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील तरुणांनीही उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे येण्याचा निर्धार केला पाहिजे. उद्योग क्षेत्राची प्रगती झाली तरच तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल.पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. शासन स्तरावर आवश्यक असलेल्या योजना तालुक्यात आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन, अशी ग्वाही येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात विधानपरिषद भाजपचे गटनेते आ.प्रवीण दरेकर यांनी दिली.
पोलादपूर तालुक्यातील कोतवाल येथील कालकाईमाता क्रीडा व सामाजिक संस्था (रजि.) यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक तथा भाजपा गटनेते, विधानपरिषद सदस्य आ. प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शेतकरी मेळावा, कर्तव्यदक्ष सेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा तसेच डॉक्टर फॉर यू यांच्या माध्यमातून आशा सेविकांना मेडिकल किट वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या मेळाव्याला शेतकरी, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
या शेतकरी मेळाव्यात आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्मान भारत कार्ड तसेच आभा कार्डसाठी व महसुल विभागातर्फे शिधापत्रिका, इतर योजना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती तालुका कृषी सहाय्यक रवींद्र गुंड यांनी दिली.
यावेळी कर्तव्यदक्ष सेवा सन्मान पुरस्काराने तहसीलदार कपिल घोरपडे, महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी चोरमळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संदेश कांबळे, कृषी विभाग व पंचायत समितीतील अधिकारी तसेच नरवीर रेक्स्यूचे संस्थापक रामदास कळंबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आ. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी आ.दरेकर यांनी माजी सैनिक शिवाजी डोळे यांचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा, असे आवाहन केले. तरुणांनी उद्योग क्षेत्रात पुढे येऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे. उद्योजकतेसाठी आवश्यक असलेले अर्थसहाय्य तसेच अन्य मदत करण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे आ.दरेकर यांनी सांगितले.
महिला वर्गानेही रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. बँकांच्या माध्यमातून महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचेही आ. दरेकर यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला सभापती अविनाश शिंदे, भाजपा उपाध्यक्ष मनोज भागवत, बिपिन म्हामुणकर, माजी तालुकाध्यक्ष प्रसन्न पालांडे, भाजपा नेते नागेंद्र राठोड, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, सुभेदार सुभाष दरेकर, तालुकाध्यक्ष वैभव चांदे, युवा मोर्चा उपाध्यक्ष दर्पण दरेकर, शहराध्यक्ष महेश निकम, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष शुभम दरेकर, शिवसेना नेते निलेश अहिरे, उद्योजक रामदास कळंबे, सर्व सरपंच व उपसरपंच, तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाट, महावितरणचे अधिकारी चोरमुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संदेश कांबळे, उद्योजक कृष्णकांत दरेकर, संस्थेचे अध्यक्ष राजेश सकपाळ सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.