
उरण | विठ्ठल ममताबादे
उरण-बोरी येथील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या १४ वर्षीय प्रियांशी मयूर पाटील हिने विंडसर्फिंग क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत उरणसह रायगड आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रियांशीने सलग दुसऱ्या वर्षी ‘एशियन मेडलिस्ट’चा मान मिळवला आहे.
२०२५-२६ या कालावधीत टेक्नो २९३ गट १५ आणि गट १७ गर्ल्स विभागात प्रियांशीने तब्बल १४ राष्ट्रीय आणि ३ आंतरराष्ट्रीय पदके मिळवत आपल्या क्रीडा कारकिर्दीची दमदार छाप उमटवली. याटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून ती विंडसर्फिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. २०२५ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या इंटरनॅशनल ओपन विंडसर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदक, तर नोव्हेंबर २०२५ मध्ये थायलंड येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले. एप्रिल २०२६ मधील विंडसर्फिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये टॉप-१० मध्ये स्थान मिळवतानाच जुलै २०२६ मध्ये पोलंड येथे झालेल्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्येही तिने सहभाग नोंदवला.
दरम्यान, ४ ते ८ ऑगस्ट २०२६ दरम्यान मलेशिया येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये प्रियांशीने चुरशीच्या शर्यतीत दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. विशेष म्हणजे कोणतेही प्रशिक्षक नसताना केवळ आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे यश मिळवले आहे. सलग दोन वर्षे आशियाई स्तरावर पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील कमी वयाच्या खेळाडूंमध्ये तिची विशेष नोंद झाली आहे. तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शाळा, क्रीडा क्षेत्र आणि उरण परिसरातून कौतुक होत असून, भविष्यात प्रियांशीने भारतासाठी आणखी मोठी पदके जिंकून आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर तिरंगा अभिमानाने फडकवावा, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
Related