धाकटा खांदा गावातील पूजा बाळकृष्ण म्हात्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून राज्य कर निरीक्षक पदावर निवड मिळविली आहे. शासकीय सेवेत जाण्याचे ध्येय समोर ठेवून त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य वेळेचे नियोजन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळविले. गावातील मुलीने स्पर्धा परीक्षेत यश मिळवत प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्याने त्यांच्या यशाचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.
पूजा म्हात्रे यांच्या यशाची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे पनवेल शहराध्यक्ष सतीश पाटील यांनी धाकटा खांदा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांनी पूजा यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून योग्य नियोजन, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ती पूर्ण करावीत, असा संदेशही त्यांनी दिला.
राज्य कर निरीक्षक म्हणून पूजा म्हात्रे यांच्यावर आता महत्त्वाची शासकीय जबाबदारी येणार आहे. नागरिकांशी संबंधित कामकाज करताना प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशीलता जपत जनसेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या यशामुळे धाकटा खांदा तसेच परिसरातील विद्यार्थी-तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली असून, मेहनतीला सातत्याची आणि ध्येयाला जिद्दीची जोड मिळाली की यशाचा मार्ग निश्चितच खुला होतो, याचा प्रत्यय पूजा म्हात्रे यांच्या यशातून आला आहे.