दुर्गम महाराष्ट्रात आता धावणार ‘लालपरी’; १०० मिडी बसेस ताफ्यात होणार दाखल

मुंबई | विशेष प्रतिनिधी 
 महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्या, दुर्गम वाड्या-वस्त्या आणि अरुंद रस्त्यांवरील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १०० ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिडी बसेस दाखल होणार आहेत. या २८ आसनी बसेसच्या माध्यमातून आदिवासी बांधव, ग्रामीण जनता तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुर्गम मार्गांवर एसटीची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
डोंगर-दऱ्या, तीव्र चढ-उतार, अरुंद रस्ते आणि नागमोडी वळणांमुळे अनेक दुर्गम भागांत मोठ्या बसेस पोहोचणे कठीण होते. परिणामी, काही भागातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन मोठ्या बसेस जाऊ शकत नसलेल्या मार्गांवर मिडी बसेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बससेवेमुळे दुर्गम भागातील नागरिकांना बाजारपेठ, रुग्णालय आणि शहरांशी जोडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे. काही मार्ग आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसले तरी नफा-तोट्यापेक्षा आदिवासी बांधव आणि विद्यार्थ्यांची पायपीट थांबविणे महत्त्वाचे असल्याची भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली. ‘एसटी तेथे एसटी’ या भूमिकेतून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत सार्वजनिक वाहतूक पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
‘गाव तिथे एसटी’ ही एसटीची जुनी ओळख असून, अद्याप एसटी सेवा न पोहोचलेल्या आदिवासी पाड्यांना मिडी बसेसच्या माध्यमातून जोडण्याचे उद्दिष्ट आहे. ही सेवा केवळ वाहतुकीची सुविधा न राहता दुर्गम भागातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे माध्यम ठरेल. “लालपरीची ही धाव केवळ किलोमीटर मोजणारी नसून, माणसांमधील अंतर कमी करणारी आहे,” असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.