माणगांव बसस्थानकातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड; दोघांना अटक

माणगांव | नरेश पाटील
गणपती सणानिमित्त मूळ गावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून सुमारे सहा तोळे वजनाचे आणि अंदाजे ९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना माणगाव बसस्थानक परिसरात घडली होती. या प्रकरणाचा तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे माणगाव पोलिसांनी महिला आरोपीसह तिच्या साथीदाराला अटक करून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधना राज बागडे (वय २९, रा. उखर्डी, पो. जिते, ता. माणगांव) यांनी याबाबत माणगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास बसमध्ये चढताना त्यांच्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र व गंठण अज्ञात व्यक्तीने लंपास केले होते. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपास, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच माणगाव ते कोणेगाव, भिवंडी व ठाणे परिसरात केलेल्या तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून माणगांव पोलीस ठाण्यातील इतर गुन्ह्यांचीही माहिती समोर आल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. आरोपींनी महाड, दादर, सागरी, कोलाड, खोपोली, दिवेसागरी, पेण, रोहा तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पनवेल, कल्याण आदी भागांत चोरी केल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही कारवाई माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.