मतदार याद्यांवरील वाद चिघळला; उद्या काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

माणगांव | नरेश पाटील
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने २८ सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसने Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेदरम्यान देशभरातील सुमारे १३ कोटी मतदारांची नावे प्रारूप मतदार याद्यांमधून वगळल्याचा दावा केला असून, त्यापैकी तीन कोटींपेक्षा अधिक नावे महाराष्ट्रातील असल्याचे म्हटले आहे. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत झालेल्या सुमारे ४७ लाख मतदारांच्या वाढीबाबतही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘वोट चोरी’ आणि मतदार यादीतील नावांच्या वजावटीचा मुद्दा घेऊन काँग्रेसने हा विषय जनतेसमोर नेण्याची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने SIR संदर्भातील आदेश तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीनंतरच जारी झाल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेसाठी दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदतही १२ दिवसांनी वाढवून १२ ऑक्टोबर करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचे प्रदेश काँग्रेसने जाहीर केले आहे.