मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ४२ जुगारी ताब्यात, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलादपूर | शैलेश पालकर 
रायगड जिल्हा परिषदेच्या लोहारे गटातील निवडणूक प्रचारादरम्यान उघडपणे टीका होऊनही अव्याहतपणे सुरू राहिलेल्या सर्वात मोठ्या जुगाराच्या अड्ड्यावर शनिवारी दुपारी अलिबाग पोलीस मुख्यालयाच्या आदेशानुसार छापा मारण्यात आला. यावेळी ४२ आरोपींची धरपकड करण्यात येऊन १२ लाख किंमतीचे मोबाईल, मोटारसायकली, कार, जुगाराचे साहित्य, फर्निचर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. यावेळी काउंटरवरील १ लाख ३ हजार ९४० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत लोहारे येथील शिवराज बियर शॉपीच्या मागे जुगाराचा कायमस्वरूपी अड्डा सुरू असल्याची चर्चा व टीका रायगड जिल्हा परिषदेच्या लोहारे गटातील निवडणूक प्रचारादरम्यान विधानपरिषदेचे भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी जाहीर सभेत केली होती. मात्र, याकडे संबंधित यंत्रणांनी गांभिर्याने लक्ष दिले नाही आणि हा जुगाराचा अड्डा राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे सुरक्षित असल्याची भावना वाढीस लागली होती. 
परिणामी, जुगारी लोकांना हे सुरक्षित ठिकाण वाटत असल्याने माणगाव, लोणेरे, टेमपाले, गारळ, उणेगाव, गोरेगाव, शिरगाव, महाड, पोलादपूर, वाडा कुंभरोशी येथील तब्बल ४२ जुगारी येथे आप आपल्या ताब्यातील वाहने, मोबाईल व रोख रक्कम घेऊन जुगार खेळताना अलिबाग पोलीस मुख्यालयाच्या आदेशानुसार शनिवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास छापा घातला. यात आरोपींच्या अंगझडतीतून ३० मोबाईल, तीन मोटारसायकली, दोन वॅगनआर कार, रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक कॉइन्स आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि मुख्यालयाच्या आदेशानुसार म्हसळा परिमंडळ पोलीस उपअधीक्षक योगिता कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या जुगाराच्या अड्ड्यावरील धाडीदरम्यान दोन पोलीस व्हॅनमधून आरोपींना पोलादपूर पोलीस ठाण्यात आणले गेले. यावेळी ३८ आरोपी प्लास्टिक कॉइन स्वरूपात रक्कम लावून तीन पत्ता जुगार खेळताना आढळून आले तर चार आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी ३८ आरोपींकडून रक्कम घेऊन बंदिस्त जागा आणि साहित्य उपलब्ध करून दिले म्हणून गुन्हा र.नं. १०२/२०२६ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ४,५ प्रमाणे क्रमांक ३० नुसार नोंद केली. पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मुख्यालय अलिबाग येथील पोलीस शिपाई आशिष अशोक गडदे यांनी फिर्याद नोंदवली.
पोलादपूर पोलीस ठाण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या तयारीत महिला व पुरुष पोलीस कर्मचारी व्यग्र असताना अचानक पोलीस मुख्यालयाच्या आदेशानुसार झालेल्या या छाप्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यामुळे विसर्जन मिरवणूक तब्बल साडेतीन तास उशिराने सुरू झाली.