PEN न्यूज ऑनलाइन टीम |
मालकाच्या संमतीशिवाय टँकरमधून केमिकल चोरून ते बॅरलमध्ये भरत असताना दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरी केल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४० वाजता मौजे डोलवी येथील हार्डवेअर रोडच्या बाजूला असलेल्या भंगार दुकानासमोरील मोकळ्या जागेत टँकर क्रमांक एमएच ४३ वाय ७१५२ मधून केमिकल चोरी करून बॅरलमध्ये भरले जात होते. यावेळी पोलिसांनी कारवाई करत सैबान महम्मद इलियास खान (वय २४, रा. शिव शिळफाटा, कल्याण, मूळ सुलतानपूर, उत्तर प्रदेश) आणि अशरफ कमरुद्दीन खान (वय ३९, रा. सी.पी. तलाव, वागळे इस्टेट, ठाणे) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी घटनास्थळावरून अॅसिटोन केमिकलने भरलेले प्रत्येकी २०० लिटर क्षमतेचे दोन निळ्या रंगाचे प्लास्टिक बॅरल, एक काळ्या रंगाचा प्लास्टिक पाईप, एक २०० लिटर क्षमतेचे रिकामे निळे प्लास्टिक बॅरल, असा मुद्देमाल जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत ५३,७२० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी ३० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास वडखळ पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
