वृक्षारोपण ही अक्षर विद्यालयाची एक गौरवशाली परंपरा असून वृक्ष म्हणजे केवळ निसर्ग आणि सौंदर्य नसून आपण सर्वजण घेतो तो निरोगी श्वास आहे. अशी या मागची भावना झाडांच्या २६ व्या वृक्ष वाढदिवस समारंभात बोलताना पेण तालुक्याचे नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी व्यक्त केली.
रायगड पेण येथील ईको-फ्रेंडली स्कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षर विद्यालयामध्ये नुकताच पर्यावरण पुरक असा वृक्षारोपण उपक्रम साजरा झाला. या कार्यक्रमासाठी पेण नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, शाळेचे संस्थापक, अध्यक्ष विजय पाटील, संचालक राहुल म्हात्रे, माजी सरपंच प्रदीप म्हात्रे, केंद्रप्रमुख प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
वृक्षसंवर्धनाचा अक्षर विद्यालय पॅटर्न
शिक्षण क्षेत्रामध्ये एकेकाळी लातूर पॅटर्न उदयास आला होता. त्याच धर्तीवर पर्यावरण क्षेत्रात आता वृक्षारोपणाचा व वृक्ष संवर्धनाचा अक्षर विद्यालय पॅटर्न निर्माण झाला आहे. अक्षर विद्यालयाच्याच धर्तीवर आता राज्यातील अनेक शाळांमध्ये, सेवाभावी संस्थांमध्ये, गावागावामध्ये आता हा वृक्ष वाढदिवस साजरा होताना दिसत आहे. राज्यामध्ये इको-फ्रेंडली स्कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अक्षर विद्यालय पॅटर्न मुळे वनसंवर्धनाची, पर्यावरणाची जनजागृती करण्यास मदत होईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन एस. जे. खरजे (सर) यांनी केले. तर सजावट गणेश डंगर (सर) याच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केली. या वेळी बोलताना प्रसाद कालेकर पुढे म्हणाले, रायगड जिल्हयात अनेक प्रदूषणकारी प्रकल्प आहेत. अशावेळी अक्षर विद्यालयाचा हा गौरवशाली उपक्रम कौतुकास्पद असून शाळेने निर्माण केलेल्या या सुंदर वनराई पासून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. म्हणून आपल्या सर्वाना आहवान करतो की प्रत्येकाने दर वर्षी किमान एक तरी झाड लाऊन जगविले पाहिजे.
गौरव विद्यार्थ्यांचा
या कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रथम क्रमांक दिया नाईक, द्वितीय, मानव पाटील, तृतीय, भूमिका ठाकूर. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या शाळेत केवळ झाडे लावली जात नहीत तर लावलेली झाडे जगवून त्याचा वाढदिवस साजरा केला जातो. मानवाप्रमाणे झाडांनाही दिर्घायुष मिळो अशी या मागची भावना असून मुलांप्रमाणे येथे झाडाचाही केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. अक्षर विद्यालयाने सुरु केलेला हा उपक्रम राज्यातील इतर शाळा तसेच सेवाभावी संस्थेमध्ये साजरा केला जातो. अक्षर विद्यालयाने सुरु केलेला वृक्षवाढदिवस हा देशातील एकमेव उपक्रम आहे.
या कार्यक्रमाला प्रभाकर नाईक, चंद्रकांत पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सामाजिक वनीकरणाचे समीर पवार आणि वनविभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.