ज्येष्ठ पत्रकार ‘शैलेश पालकर’ यांना पुणे येथे सुजय फाउंडेशनचा सेवारत्न पुरस्कार प्रदान 

पुणे | प्रतिनिधी 
स्वतःच्या मुलाचा रक्ताच्या कर्करोगामुळे मृत्यू झाल्यानंतरही त्या दुःखावर मात करून सुरेश सकपाळ यांच्या सुजय फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेली समाजसेवा प्रेरणादायी आहे. समाजातील सेवाभाव जपण्याची नितांत गरज आहे. पैसा आणि पद नसतानाही सामाजिक कार्य करता येते, याची प्रेरणा सुरेश सकपाळ यांच्या कार्यातून प्रत्येकाने घ्यावी, असे मत निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केले.
सुजय फाउंडेशन आणि मैत्री रक्ताची यांच्या वतीने सुजय सकपाळ यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा, मोफत आयुर्वेदिक तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव बोलत होते. यावेळी रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व रक्तदाते शैलेश पालकर यांना ‘सेवा रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अप्पर आयुक्त आरआरएस शिवकुमार साळुंखे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम, उद्योजक किसन भोसले, विद्याताई जाधव, कस्टम अधिकारी स्नेहल खैरे, अप्पर राज्यकर आयुक्त उमाकांत बिराजदार, सुधीर सकपाळ, उमेश सकपाळ,सुजय प्रतिष्ठानचे प्रमुख सुरेश सकपाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सुजय फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ११७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, उद्योजक किसन भोसले, उमाकांत बिराजदार, सागर घोरपडे, विठ्ठल जाधव आणि उषा म्हात्रे यांनादेखील यावेळी ‘सेवा रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. संतोष जाधव, डॉ. सुरेश राठोड, हरिभाऊ शिवले, मधुकर चौधरी, उज्ज्वला गौड, किरण सावंत, विजय ठुबे, श्याम झवर यांच्यासह श्री काळभैरवनाथ फाउंडेशन, होय हिंदू आणि आदर्श सेवा मंडळ या संस्थांना ‘समाज गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपिठावरील मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त केले.
यावेळी आयुरनिर्माण हेल्थ फाउंडेशन आणि एसएलएस वेलनेस यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तसेच मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नागरिकांची आयुर्वेदिक आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर भंडारी यांनी केले तर सुरेश सकपाळ यांनी प्रास्ताविक केले.