महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोलनाके बंद करा; फलकांवर मराठीला अग्रक्रम देण्याची राज पार्टे यांची मागणी
पोलादपूर | शैलेश पालकर
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्या देखरेखीखाली सुरू असून आजतागायत हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून त्यामुळे कोकणातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे मुख्य अभियंत्यांच्या उचलबांगडीसह मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील सर्व टोलनाके बंद करण्यासोबत टोलनाक्यांजवळ मराठी फलकांची मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले आहे.
वडखळ पूल, नागोठणे पूल, लोणेरे पूल तसेच या पुलांच्या दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड अत्यंत खराब अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वारंवार अपघात होत असून निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत.
मुख्य अभियंता संतोष शेलार हे अधिकारी गेली सुमारे सात वर्षे एकाच पदावर कार्यरत आहेत. शेलार यांना देण्यात आलेल्या पदोन्नती व इतर प्रशासकीय निर्णयांची सखोल चौकशी करून संतोष शेलार यांच्या उचलबांगडीची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आगामी गणेशोत्सवापूर्वी मुंबई–गोवा महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने भरून रस्ता सुरक्षित करावा व माणगाव बायपासचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीस खुला करण्यासाठी आवाहन करताना महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसतानाही सुरू करण्यात आलेला खारपाडा टोलनाका कार्यरत करून अपूर्ण रस्त्यावर टोल वसूल करणे हे कोकणवासीयांना अन्यायकारक आहे. त्यामुळे खारपाडा टोलनाका बंद करून इतर कोणतेही टोलनाके महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत सुरू करण्यात येऊ नयेत अशी मागणी करताना टोलनाक्यावरील तसेच महामार्गालगतचे अनेक दिशादर्शक व माहिती फलक इंग्रजी व हिंदी भाषेत असून मराठी भाषेला कनिष्ठ स्थान असल्याने सर्व फलकांवर मराठी भाषेला अग्रक्रम देण्याचा आग्रह या निवेदनात करण्यात आला आहे.
या निवेदनातील विविध मागण्या कोकणवासीयांच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याने त्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देत. मुंबई–गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोकणातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अशी ग्वाही मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी दिली आहे.