जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर अंडा पॉईंटजवळ भीषण अपघात; दोन कार पाईपखाली अडकल्या, सुदैवाने जीवितहानी टळली

रायगड | अमुलकुमार जैन
पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर अंडा पॉईंट परिसरात काल रात्री उशिरा एक धक्कादायक अपघात घडला. हेवी पाईप वाहून नेणाऱ्या टेम्पोने उभारलेल्या हाइट बॅरिकेडला जोरदार धडक दिल्याने पाईप पुढे सरकून मागून येणाऱ्या दोन कार पूर्णपणे त्याखाली अडकल्या. या विचित्र अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली; मात्र सुदैवाने दोन्ही कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग पथक, हेल्प फाउंडेशन, घाटातील क्रेन ऑपरेटर, मेकॅनिक्स, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यात आले आणि सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली. जखमींना लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्सने पवना येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांच्या जलद आणि समन्वयित प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर पोलीस आणि महामार्ग वाहतूक अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कडक सुरक्षा उपाययोजना आणि सातत्यपूर्ण निरीक्षणाची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.