गोपाळकाळा व गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस पाटलांचं सहकार्य महत्त्वाचं

चौक | अर्जुन कदम
 गोपाळकाळा आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गाव पोलीस पाटील यांचे सहकार्य व योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांनी केले. यानिमित्त खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटलांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘आपले सरकार’ तसेच Citizen पोर्टलवर ऑनलाइन परवानगी घ्यावी, गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवक नियुक्त करावेत आणि मूर्ती व मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. सण-उत्सव काळात अवैध धंदे होणार नाहीत याबाबत माहिती देण्याचे तसेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे बॅनर, देखावे किंवा चित्रफिती प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
मिरवणूक मार्गातील अडथळ्यांची माहिती पोलिसांना द्यावी, गरबा-दांडिया ठिकाणी महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच विसर्जन मिरवणुकीत डीजे व डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याबाबत गणेश मंडळांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. बैठकीस पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोंबरे यांच्यासह ३५ पोलीस पाटील उपस्थित होते.