अलिबाग तालुक्यात सर्पदंशानं पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

पोयनाड | जीवन पाटील 
अलिबाग तालुक्यातील मुळची वाघ्रण गावची आणि सध्या कालेखिंडनजीक मैनुशेठ वाडा येथे राहणाऱ्या कुमारी हर्षवी सिद्धेश पाटील (वय ५) हिचे १ सप्टेंबर २०२६ रोजी सर्पदंशाने दुर्दैवी निधन झाले. शाळेतून घरी आल्यानंतर जेवण करून ती आजोबा नरेंद्र पाटील यांच्यासोबत घरासमोरील दुसऱ्या घरात झोपली होती. सायंकाळी आजोबा काही वेळासाठी उठून गेल्यानंतर दबा धरून आलेल्या सापाने हर्षवीला दंश केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, काही वेळाने आजी तिला उठवण्यासाठी गेल्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी तिला अलिबाग येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. चांदोरकर यांच्याकडे उपचारासाठी नेले. मात्र सुरुवातीला सर्पदंश झाल्याचे स्पष्ट झाले नव्हते. प्रकृतीत सुधारणा न होता तोंडाला फेस येणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले; मात्र सर्पदंशाची पूर्ण माहिती वेळेत स्पष्ट न झाल्याने उपचारात अडथळा निर्माण झाला आणि अखेर हर्षवीचे निधन झाले.
हर्षवीच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आई ॲड. सुप्रिया सिद्धेश पाटील, वडील सिद्धेश नरेंद्र पाटील, काका-काकू तसेच आजी-आजोबांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. तिच्यावर १ सप्टेंबर रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 
———————————–
या दुःखद घटनेनंतर हर्षवीच्या वडिलांनी सर्पदंश झाल्याचा संशय आल्यास विलंब न करता तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.