पावसाने शनिवारी काहीशी विश्रांती घेतली असली, तरी रोह्यातील गोविंदांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. पारंपरिक पद्धतीने गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तीन प्रमुख आळ्यांमधून गोविंदा पथके दुपारनंतर ठरलेल्या क्रमाने बाजारपेठेत दाखल झाली. वाटेत ठिकठिकाणी बांधलेल्या दहीहंड्या फोडत गोविंदांनी उत्सवाचा आनंद लुटला. उंच दहीहंड्यांचा थरार पाहण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
रोहा तालुक्यात यंदा जवळपास १२४ दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. रोहा शहरातील तालुका शिवसेना व आमदार महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानची दहीहंडी स्पर्धा, माजी खासदार सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानची दहीहंडी, राममारुती चौकातील रोटरी क्लबची दहीहंडी, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांची बाजारपेठेतील दहीहंडी तसेच भाजप नगरसेवक रोशन चाफेकर यांची तीनबत्ती नाका येथील दहीहंडी या गोविंदोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरल्या.
परंपरेनुसार साईनाथ मित्र मंडळ मोरे आळी, जय गिरोबा अंधार आळी आणि ‘रोह्याचा राजा’ धनगर आळी या गोविंदा पथकांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने बाजारपेठेत प्रवेश केला. गौरोबा नगर-दामखाडी तसेच महात्मा फुले नगर, धावीर रोड येथील संत रोहिदास गोविंदा पथकांनीही तीनबत्ती नाका पोलिस चौकीपर्यंत येत मार्गातील दहीहंड्या फोडल्या. त्यानंतर तीनबत्ती नाका येथून नदीच्या दिशेने जात गोविंदा पथकांचा उत्सवाची सांगता झाली.
गोविंदोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलिस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
———————————
खारी गावाने दिली ८ थरांची सलामी!
शिवसेना रोहा तालुका आयोजित दहीहंडी स्पर्धेत खारी गावाच्या गोविंदा पथकाने तब्बल ८ थरांची सलामी देत उपस्थितांची मने जिंकली. गोविंदांनी रचलेला हा थरारक मानवी मनोरा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ८ थरांचा थरार पाहून उपस्थितांनी जल्लोष करत गोविंदांचा उत्साह वाढविला.