“शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांसाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱ्या स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील, ॲड. दत्ता पाटील आणि स्व. मीनाक्षी पाटील यांचे विचारच आमची खरी शिदोरी आहे. या पुरोगामी विचारांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता माफ करणार नाही,” असा घणाघात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि. १६) वेश्वी येथे भरलेल्या बैठकीत केला.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अलिबाग पंचायत समिती माजी सभापती अनिल गोमा पाटील, वृषाली ठोसर, ॲड. नीलम हजारे, नंदकुमार मयेकर आदी मान्यवरांसह अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षप्रेमाची प्रचिती दिली. जयंत पाटील पुढे म्हणाले, “आज विचारांच्या गद्दारांनी आमच्याच विचारांची मोडतोड सुरू केली आहे. मात्र कार्यकर्त्यांनी दाखवलेली एकजूट हीच खरी ताकद आहे. सत्तेसाठी पक्षाशी आणि विचारांशी गद्दारी करणाऱ्यांची नावे जनतेसमोर आली आहेत. आगामी काळात निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षात वेगळं स्थान मिळणार आहे.”
चित्रलेखा पाटील यांनीदेखील भावुक होत “आईसमान सासूची बहिण आणि वडिलसमान सासऱ्याच्या भावानेच गद्दारी केली, हे पाहून डोळ्यात अश्रू आले,” असे सांगताना निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपस्थिती हीच खरी शक्ती असल्याचे अधोरेखित केले.
“आजोबांचे विचार संपू देणार नाही. त्यांची पुण्याईच आमच्या कामाचा पाया आहे. या लढ्याला कुणीही रोखू शकत नाही,” अशी ठाम भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.
शेकापने आतापर्यंत गोरगरीबांची बाजू घेतली असून, आगामी निवडणुकांमध्ये निष्ठावंतांची ताकद दाखवत गद्दारांना चपराक देण्यात येईल, असा विश्वास या बैठकीतून पक्षाने जनतेसमोर ठेवला.