मुंबई ते गोवा रस्ते प्रवास आता अधिक वेगवान आणि सुसाट होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम अखेर अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. देशातील अनेक महामार्ग पूर्ण झाले असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 मात्र अनेक अडचणींमुळे रखडत होता.
या मार्गासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या, आंदोलने झाली, परंतु प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यास अडथळे येत होते. जमिनीचे तुकडे आणि त्याचे अनेक वारसदार हे मुख्य अडथळे होते. काही ठिकाणी एका जमिनीला तब्बल पंधरा वारसदार असल्यामुळे मोबदला देण्यात अनेक अडचणी आल्या.
मात्र आता हे सर्व अडथळे दूर करण्यात यश आले असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट घोषणा केली आहे की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम जून 2025 अखेर पूर्ण होईल. त्यांनी ठामपणे सांगितले की, हे काम शंभर टक्के पूर्ण होईल आणि कोकणवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल.
दादर येथे झालेल्या वसंत व्याख्यान मालेत गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी मान्य केले की, दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा हे दोन महामार्ग वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या विभागावर टीका झाली. हे आमच्यासाठी एक ब्लॅक स्पॉट ठरले, असेही ते म्हणाले. मात्र आता अधीरपणे वाट पाहणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे.
जून 2025 नंतर मुंबई ते गोवा रस्ते प्रवास अधिक आरामदायक, जलद आणि सुरक्षित होणार आहे.