गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या भाविक व वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेऊन माणगाव पोलिसांनी केलेल्या वाहतूक नियोजनानुसार शहरातील मुख्य चौकातील एसटी बसचा थांबा तात्पुरता स्थलांतरित करण्यात आला आहे. नाणोरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, माणगाव रेल्वे स्थानकाजवळ व माणगाव शहराच्या दिशेने असलेल्या ठिकाणी हा तात्पुरता थांबा करण्यात आला असून, कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही व्यवस्था आजपासून ते १३ सप्टेंबरदरम्यान राहणार आहे. तसेच गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासाच्या काळातही तीन दिवस ही तात्पुरती व्यवस्था लागू राहणार आहे.
हा तात्पुरता थांबा माणगाव शहरापासून अवघ्या दोन मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर असल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय होणार नाही. या ठिकाणी प्रवाशांना उतरता तसेच पुढील प्रवासासाठी एसटी बसमध्ये बसता येणार आहे. महाड, खेड, चिपळूण, रत्नागिरी तसेच पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी या व्यवस्थेचा उपयोग होणार आहे.
माणगांवव शहरातील मुख्य चौक अरुंद असून, एसटी बसची ये-जा होताना इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवते. गणेशोत्सवाच्या काळात दररोज सुमारे ७०० ते १२०० एसटी बस माणगांवमार्गे कोकणाच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे तसेच गुजरात, मध्य प्रदेश आदी भागांतून लाखो कोकणवासीय, भाविक, प्रवासी व पर्यटक आपल्या मूळगावी जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६चा वापर करतात.
या पार्श्वभूमीवर मुख्य चौकात एसटी बसमुळे होणारा संभाव्य वाहतुकीचा अडथळा टाळण्यासाठी पोलिसांनी वेळेपूर्वीच हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे. गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी या तात्पुरत्या एसटी थांब्याची प्रायोगिक चाचणीही घेण्यात आली. यावेळी माणगाव पोलीस, एसटी अधिकारी, प्रवासी तसेच माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चाचणी यशस्वी झाल्याने नव्या व्यवस्थेची कार्यक्षमता स्पष्ट झाली.
दरम्यान, या तात्पुरत्या व्यवस्थेच्या कालावधीबाबत या प्रतिनिधीने माणगांव एसटी आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून माहिती घेतली असता, कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान तात्पुरता एसटी थांबा कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गणेशोत्सवानिमित्त कोकणातून परतीचा प्रवास सुरू झाल्यावर परतीच्या प्रवाशांसाठीही तीन दिवस ही तात्पुरती व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.
गणेशोत्सवातील संभाव्य वाहतूक कोंडीचा विचार करून माणगाव पोलिसांनी केलेले हे नियोजन आणि गर्दीपूर्वीच घेतलेला प्रतिबंधात्मक निर्णय कौतुकास्पद ठरत असून, यामुळे शहरातील मुख्य चौकासह मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.