खालापूर स्वामी समर्थ मठातील चोरीचा पर्दाफाश; चांदीच्या पादुकांसह चोरटे जेरबंद

चौक | अर्जुन कदम 
खालापूर येथील श्री स्वामी समर्थ मठातील मंदिरातून चोरीस गेलेल्या सुमारे १ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका खालापूर पोलिसांनी अखेर हस्तगत केल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पुणे परिसरातून संशयितांना ताब्यात घेत ही कारवाई केली.
प्राप्त महिटिनुसार,बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी मठातील मंदिरातून अंदाजे ६५६ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. संशयितांनी विनानंबर दुचाकीवरून खालापूर फाटा, चौक, दांडफाटा, रसायनी, आपटा, खारपाडा टोलनाका, पेण, कोलाड, ताम्हिणी घाट मार्गे पुण्याच्या दिशेने प्रवास केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दि. ६ सप्टेंबर रोजी संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या चांदीच्या पादुकाही हस्तगत करण्यात आल्या. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खालापूर पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पथकाने ही कारवाई केली. चोरीचा गुन्हा उघडकीस आणून पादुका हस्तगत केल्याबद्दल खालापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.