कोलमांडला (ताराबंदर) खाडीत पर्यावरणाचा विजय; अनधिकृत भराव हटवून मॅंग्रोव्ह पुनर्संचयितीला वेग  

अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील मौजे कोलमांडला (ताराबंदर) येथील खाडी परिसरात पर्यावरण रक्षणासाठी उभ्या राहिलेल्या ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. अनधिकृत मातीभरावावर प्रशासनाने हातोडा चालवत कांदळवन पुनर्संचयितीच्या कामाला वेग दिला आहे. सुमारे दोन एकर क्षेत्रात खारफुटी (मॅंग्रोव्ह) पुनर्संचयित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून परिसरात पुन्हा हिरवाईची चाहूल लागली आहे.
ताराबंदर येथील गट क्रमांक ५४ ही जमीन शासकीय राखीव वन म्हणून सूचित असतानाही काही जमीन माफियांकडून मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आला होता. या प्रकारामुळे समुद्री जैवविविधतेचे नुकसान झाले, तसेच स्थानिक मच्छीमारांचे बोटी ने-आण करण्याचे मार्गही बंद झाले होते. अनेक तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकरण थेट राष्ट्रीय हरित लवाद येथे नेले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.
पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ नुसार कांदळवने ‘अत्यंत संवेदनशील’ श्रेणीत मोडतात आणि त्यांच्या ५० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. तरीदेखील खाडी परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे मोठा पर्यावरणीय धोका निर्माण झाला होता. मात्र आता अनधिकृत भराव हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अधिकृत मोजणी करून भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने पुनर्संचयितीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. उपवनसंरक्षक (वन्यजीव) ठाणे आणि कांदळवन कक्ष, मुंबई यांनीही हिरवा कंदील दर्शवला आहे. ‘फॉरेस्ट रिजनरेशन अँड एन्व्हायर्नमेंटल सस्टेनेबिलिटी ट्रस्ट’, पुणे यांच्या माध्यमातून या क्षेत्रात मॅंग्रोव्ह वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम केले जाणार आहे. या कारवाईमुळे स्थानिक मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोटी शाकारण्यासाठी आणि मासेमारीसाठी जाण्या-येण्याचे मार्ग मोकळे होणार असून उपजीविकेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ताराबंदर खाडीत पर्यावरणाचा विजयघोष घुमला असून, रायगडमध्ये पर्यावरणपूरक निर्णयाचा आदर्श उभा राहिला आहे.