आजिवलीत सव्वा लाखांचा गुटखा जप्त; एकाला ताब्यात

पनवेल | संजय कदम
पनवेल तालुक्यातील आजिवली गाव परिसरातील एका किराणा दुकानात आणि गोदामात टाकलेल्या छाप्यात सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाणे यांच्या पथकाने ही कारवाई करत बेकायदेशीर साठ्यावर हातोडा चालवला.
गोपनीय माहितीच्या आधारे वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला. आरोपी रामसौदागर सहदेव भगत (वय ६५) हा किराणा दुकान व गोदामात विविध कंपन्यांचा केशरयुक्त विमल पान मसाला साठवून विक्री करत असल्याचे आढळले. झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.