मुंबईत कुरार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांसह पीएसआय एसीबीच्या जाळ्यात

 अमुलकुमार जैन |
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाच लाच घेताना रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने टाकलेल्या सापळ्यात कुरार पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि पीएसआय ज्ञानेश्वर जुन्ने यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे झाडाझडतीदरम्यान वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमधून तब्बल ६ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी दोन लाख रुपये आधीच स्वीकारल्याचा आरोप आहे. उर्वरित एक लाख रुपयांची रक्कम देण्यास तक्रारदाराने नकार देत थेट एसीबीकडे तक्रार केली. प्राथमिक चौकशीत तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर एसीबीने सापळा रचून बुधवारी रात्री उर्वरित एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले.
कारवाईनंतर करण्यात आलेल्या झाडाझडतीत केबिनमध्ये मोठी रोख रक्कम आढळून आली असून जप्त करण्यात आलेल्या ६.३४ लाख रुपयांबाबत अधिक तपास सुरू आहे. ही रक्कम कोणत्या व्यवहारातून आली याची चौकशी केली जात आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता २३ तारखेपर्यंत एसीबी कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.