कोकणात रायगड पोलिसांचाच दबदबा! २२ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपदावर मोहोर

अलिबाग | अमुलकुमार जैन
कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि व्यावसायिक कौशल्याचा पुन्हा एकदा ठसा उमटवत रायगड पोलीस दलाने २१ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ मध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. विविध स्पर्धात्मक विषयांमध्ये दमदार कामगिरी करत रायगड पोलिसांनी तब्बल २२ पदकांची कमाई केली आणि पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर झेंडा रोवला.
या प्रतिष्ठेच्या मेळाव्यात रायगड पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांनी सहा स्पर्धात्मक विषयांमध्ये आपल्या ज्ञान, तपासकौशल्य, व्यावसायिक क्षमता आणि संघभावनेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धेत रायगड पोलिसांनी ९ सुवर्ण, ६ रजत आणि ७ कांस्य अशी एकूण २२ पदके जिंकत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले.
हे यश केवळ पदकांपुरते मर्यादित नसून रायगड पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण, कठोर मेहनत, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि कर्तव्याप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक मानले जात आहे. अधिकारी व अंमलदारांनी प्रत्येक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कोकण परिक्षेत्रात रायगड पोलिसांची वेगळी ओळख निर्माण केली.
या उल्लेखनीय यशाबद्दल रायगड पोलीस दलातील सर्व विजेते अधिकारी, अंमलदार तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कामगिरीमुळे रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, भविष्यातही अशाच यशस्वी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.