राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळाल्यानंतरही शासकीय निवासस्थानाचा प्रश्न सुटलेला नसल्याने विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर पुन्हा चर्चेत आले आहेत. उपसभापतीपदाची धुरा सांभाळत असतानाही त्यांना प्रोटोकॉलनुसार अपेक्षित शासकीय बंगला अद्याप मिळालेला नाही. ‘रायगड’ आणि ‘पुरंदर’ हे दोन्ही बंगले उपलब्ध न झाल्याने अखेर सामान्य प्रशासन विभागाने चर्चगेट येथील ‘सुनीती’ इमारतीतील फ्लॅट मंजूर केला आहे. मात्र, अहिर यांनी अद्याप या फ्लॅटचा ताबा घेतलेला नसल्याने त्यांच्या शासकीय निवासाचा पेच कायम आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठे वळण मिळाले. पक्षप्रवेशानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे राज्याच्या सत्ताकेंद्रात त्यांचे महत्त्व वाढले. मात्र, पद मिळाले तरी अधिकृत शासकीय बंगला न मिळाल्याने आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.
माहितीनुसार, मंत्रालयासमोरील ‘रायगड’ (ए-६) हा शासकीय बंगला सुरुवातीला सचिन अहिर यांच्यासाठी निश्चित करण्यात आला होता. परंतु हा बंगला सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात असल्याने त्याचे वाटप होऊ शकले नाही. परिणामी हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. त्यानंतर अहिर यांनी ‘पुरंदर’ (सी-३) या बंगल्याची मागणी केल्याची माहिती समोर आली. हा बंगला यापूर्वी विधान परिषदेच्या तत्कालीन उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या ताब्यात होता. मात्र, अहिर यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच तो विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना मंजूर करण्यात आला. त्यामुळे दुसराही पर्याय बंद झाला आणि उपसभापतींसाठी योग्य बंगला उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने चर्चगेट येथील ‘सुनीती’ इमारतीतील फ्लॅट सचिन अहिर यांना मंजूर केला. मात्र, त्यांनी अद्याप त्या फ्लॅटचा ताबा घेतलेला नाही. उपसभापतीपदाला साजेसा शासकीय बंगला मिळावा, अशी त्यांची अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा प्रश्न ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळे वरळीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. वरळीमध्ये मजबूत संघटनात्मक पकड असलेल्या अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. विशेषतः आदित्य ठाकरे यांच्या राजकीय बालेकिल्ल्यात हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
राज्यातील सत्ताधारी पक्षातील महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या नेत्यालाच शासकीय निवासस्थानासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने या प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता उपसभापती सचिन अहिर यांना प्रोटोकॉलनुसार स्वतंत्र शासकीय बंगला मिळणार की ‘सुनीती’ फ्लॅटच त्यांचा कायमचा पर्याय ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.