सांबरी केंद्रशाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

कै.रामदास तुकाराम म्हात्रे यांच्या 43 व्या पुण्यतिथी निमित्त ५० छत्र्यांचे वाटप
अलिबाग | प्रतिनिधी
 रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा, सांबरी येथे गुरुवार (दि. १६ जुलै २०२६) रोजी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि ५० छत्र्यांचे वितरण करण्यात आले. कै. रामदास तुकाराम म्हात्रे यांच्या ४३व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या उपक्रमात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून केली. कै. रामदास तुकाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र संतोष रामदास म्हात्रे (माजी विद्यार्थी संघ सदस्य) व सुनबाई पुष्पलता संतोष म्हात्रे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना ५० छत्र्यांचे वाटप केले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य दिलीपशेठ भोईर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर व शार्पनर, तसेच रायगड जिल्हा परिषद, अलिबागकडून मिळालेले गणवेश आणि लाईफ फाऊंडेशनतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या वह्यांचे वितरण करण्यात आले.
साहित्य व गणवेशाचे वितरण मुख्याध्यापिका संगीता पाटील, प्रतिक पाटील, सतीश म्हात्रे, सुबल म्हात्रे, रोहिदास शेळके, अक्षय पाटील, संतोष म्हात्रे, प्रदीप शेळके, सुनील म्हात्रे, संदेश म्हात्रे, सुप्रिया म्हात्रे, पुष्पलता म्हात्रे, रुपाली शेळके, रेखा पाटील आणि मंजुषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. विशेष म्हणजे, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत ४७ विद्यार्थ्यांची ही केंद्रशाळा असून संपूर्ण शाळेची जबाबदारी एकट्याच मुख्याध्यापिका संगीता पाटील सांभाळत आहेत. त्यांनी हा कार्यक्रमही यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पालक समिती, माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.