कर्जत तालुक्यातील शिलारवाडी जंगलातील गोंडाला भागात बेवारस मानवी सांगाडा आढळून आला आहे. गावातील काही लोकांना हा मृतदेह वजा सांगाडा दिसून आल्याने त्यांनी पोलीस पाटील व पोलिसांना याबाबत सूचित केले. कर्जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत. या मृतदेहाची पाहणी करत पंचनामा केला. तर अर्धवट अवस्थेत असलेल्या या संगड्याची ओळख पटवणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील शिलारवाडी भागात असलेल्या जंगलात अर्धवट अवस्थेत मानवी प्रेत वजा सांगाडा काही नागरिकांना दिसून आला. त्यामुळे ग्रामस्थांनी धोत्रे गावचे पोलीस पाटील मनोज रसाळ,शिलार गावचे पोलिस पाटील जनार्दन रनावरे व कर्जत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटना समजताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जयवंत वारे घटनास्थळी पोहचले. मयत व्यक्ती अनेक दिवसांपासून मृत पडलेली असेल असा अंदाज केला जात आहे. मृत्य पुरुष व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ असेल असे सांगण्यात आले आहे.
प्रेता जवळ भगव्या रंगाचा टिर्शट आहे. तर प्रेताचे अर्धाच भागाचे अवयव त्या ठिकाणी आढळून आले होते. अर्धा हात,अर्धा पाय,मुंडकं छातीचा काही भाग असे शरीराचे अवयव उचलून कशेळे ग्रामीण रुग्णालय येथे शविच्छेदनासाठी आणण्यात आले.
दरम्यान हा मृतदेह जंगलात पुरलेल्या अवस्थेत असताना जंगली प्राण्यांनी तो बाहेर काढला असल्याचे घटनास्थळावर दिसून येत होते. त्यामुळे याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. तर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कर्जत पोलिसांनी कंबर कसली आहे. मात्र मृतदेह संपूर्णतः कुजलेला असून जंगली प्राणी यांनी मृतदेहाचे लचके तोडले असल्याने त्याठिकाणी मृतदेहाचे काही भाग शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे. तर आपल्या परिसरात एखादी व्यक्ती हरवली असेल तर कशेळे, कर्जत पोलिस अधिकारी यांच्या कडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.