उरीतील ग्रेनेड स्फोटात महाराष्ट्रातील दोन जवान शहीद

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
 जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) हँड ग्रेनेडचा स्फोट होऊन महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले. या घटनेमुळे लष्करात आणि त्यांच्या मूळ गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
उरीच्या कमलकोट सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना हँड ग्रेनेडचा अचानक स्फोट झाला. या भीषण स्फोटात जवान अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने श्रीनगर येथील बादामीबाग लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
शहीद अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शाहपूर गावचे रहिवासी होते, तर शहीद विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील रहिवासी होते. दोन्ही जवान भारतीय लष्कराच्या 8 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते.
अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या या भागात लँडमाईन्स आणि इतर स्फोटकांचा धोका कायम असतो. दरम्यान, हँड ग्रेनेडचा स्फोट नेमका कसा झाला याचा तपास लष्कर आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.