काशीद बीचवर दुर्दैवी घटना; जळगावच्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू! लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्परतेने दुसऱ्या तरुणाचे वाचले प्राण

#काशिद बिच
अलिबाग | अमुलकुमार जैन
महाराष्ट्रात मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील काशीद बीचवर आज घडलेल्या दुर्दैवी घटनेत जळगाव जिल्ह्यातील 25 वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाला लाइफगार्ड आणि पोलिसांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान अन्वर खान (वय 37), अमीन मजीद शेख (वय 25) आणि मलिक नजीर शेख (वय 21, सर्व रा. कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) हे ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशीद व मुरुड परिसरात आले होते. कामानिमित्त आलेले हे तिघे मोकळ्या वेळेत काशीद बीचवर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या अमीन शेख आणि मलिक शेख यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात गेले.
घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रोटकर, तसेच लाइफगार्ड मयुरेश बालकावडे आणि अरफाज सौदागर यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यांनी मलिक नजीर शेख याला सुखरूप बाहेर काढले. त्याला उपचारासाठी नांदगाव येथील आयुष्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मात्र अमीन मजीद शेख याला वाचविण्यात यश आले नाही. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मुरुड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद (एडीआर) करण्याची प्रक्रिया पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्ष रसेडे हे करीत आहेत.
या घटनेमुळे काशीद परिसरात हळहळ व्यक्त होत असून, समुद्रात उतरताना पर्यटकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि लाइफगार्डकडून करण्यात आले आहे.