भिवंडी महानगरपालिका पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र भोईर हे सर्वेअर तथा इमारत निरीक्षक पदावर कार्यरत असून प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळत होते. प्रभाग समिती क्रमांक ३ अंतर्गत सुरू असलेल्या एका अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याच्या बदल्यात त्यांनी संबंधित तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून अडीच लाख रुपये तातडीने देण्यास सांगितले होते.
याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. मंगळवारी सायंकाळी प्रभाग समिती कार्यालयाबाहेरील मैदानात स्वतःच्या कारमध्ये बसलेल्या सुरेंद्र भोईर यांना तक्रारदाराने अडीच लाख रुपयांची रक्कम दिली. त्याच वेळी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
कारवाईनंतर भोईर यांची शहर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यांचा जबाब नोंदवून पहाटे त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे महापालिकेतील कारभारावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांत भिवंडी महानगरपालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चार कारवायांमध्ये सात कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. मात्र अशा प्रकरणांतील कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई होत नसल्याची टीका होत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांना पुन्हा जबाबदारीच्या पदांवर नियुक्त केल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
भ्रष्टाचाराविरोधात केवळ निलंबन नव्हे तर दोष सिद्ध झाल्यास बडतर्फीची कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कठोर शिक्षा आणि शून्य सहनशीलतेचे धोरण राबविल्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.