अलिबाग तालुक्यात शेकाप भुईसपाट; भाजपचे कमळ न फुलता शिंदे गटाचे वर्चस्व, पंचायत समितीच्या १४ पैकी १२ जागांवर शिंदे गटाचा झेंडा

अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये अलिबाग तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या सात जागांपैकी सहा जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले असून उर्वरित एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमित नाईक यांनी पटकावली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत शेकापला एकही जिल्हा परिषद जागा मिळालेली नाही, तर भाजपचे कमळ अलिबाग तालुक्यात फुलू शकलेले नाही.
या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे थळ व चेंढरे गटातून सासू–सुना एकाच वेळी विजयी होण्याचा ऐतिहासिक योग. थळ गटातून आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी तर चेंढरे गटातून त्यांची सुनबाई व अलिबाग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अदिती नाईक दळवी या निवडून आल्या आहेत.
शहापूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित अशोक नाईक यांनी ८,९०८ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपचे माजी आमदार सुभाष पाटील ऊर्फ पंडित पाटील यांचे पुत्र सुप्रभात उर्फ सवाई पाटील, शिंदे गटाचे गिरीश पाटील तसेच शेकापचे अभिषेक पाटील यांचा पराभव केला. विशेष म्हणजे सवाई पाटील यांना अवघी २,५४७ मते मिळाल्याने ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले असून हा पराभव पंडित पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आवास गटातून शिवसेना शिंदे गटाचे दिलीप विठ्ठल भोईर यांनी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र राजेंद्र ठाकूर यांचा २,३७२ मतांनी पराभव केला. दिलीप भोईर यांना ११,९३३ तर राजेंद्र ठाकूर यांना ९,५३१ मते मिळाली. दिलीप भोईर हे तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत.
आंबेपूर गटातून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या पत्नी रसिका केणी यांनी भाजपच्या महिला आघाडी अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सभापती चित्रा पाटील यांचा तब्बल ४,५१५ मतांनी पराभव केला. चित्रा पाटील यांना ७,४५९ मते मिळाली, तर शेकापच्या पूजा भगत यांना ४,७८५ मते मिळाली.
चौल गटातून शिवसेना शिंदे गटाचे सचिन राऊळ यांनी १०,२२३ मते घेत उबाठाचे जिल्हाप्रमुख व माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांचा ३,७६७ मतांनी पराभव केला. भाजपचे उमेदवार संकेत जोशी यांना केवळ १,५३८ मते मिळाली.
कावीर गटात शिवसेना शिंदे गटाचे अनंत गोंधळी यांनी शेकापचे मोहन धुमाळ यांचा केवळ १५४ मतांनी पराभव करत अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला.
थळ गटातून मानसी दळवी यांनी शेकापच्या सानिका घरत यांचा ६,४५९ मतांनी पराभव केला. मानसी दळवी यांना १४,३२८ मते मिळाली असून त्या चौथ्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपच्या जान्हवी पारेख यांना अवघी ७७५ मते मिळाली.
चेंढरे गटातून अदिती नाईक दळवी यांनी शेकापच्या प्रवीण घासे यांचा ५,०५५ मतांनी पराभव केला.
पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले असून १४ पैकी १२ जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप व शेकापला प्रत्येकी केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
एकूणच अलिबाग तालुक्यातील निकालांनी शेकाप पूर्णतः भुईसपाट झाल्याचे, तर भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले असून शिवसेना शिंदे गटाने आपली राजकीय ताकद ठामपणे सिद्ध केली आहे.