शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महाड विधानसभा मतदार संघात विजयी चौकार मारल्यानंतर राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनीही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये चौकार मारला आहे. प्रथमच जिल्हा परिषद निवडणूक लढणारे डॉ.निलेश कुंभार यांनी 3876 मतांची आघाडी घेऊन आतापर्यंत सर्वात जास्त मताधिक्य मिळविणारा विजय संपादन केला. शिवसेना शेकाप युतीमुळे पोलादपूर पंचायत समितीमध्ये घवघवीत यश मिळाले असून शिवसेनेच्या तीन आणि शेकापक्षाची एक असे चारही उमेदवार निवडून आले. मंत्री भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूर येथील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळयाजवळ सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व विजय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याने भेट दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
डॉ.निलेश कुंभार यांचा आतापर्यंतचा मोठा विजय
पोलादपूर तालुक्यातील 58 कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात 20 हजार 447 एकूण मतदारांपैकी 12 हजार 89 मतदारांनी मतदान केले. याखेरिज, 42 पोस्टल मते असे एकूण 12 हजार 131 मतांची मोजणी करण्यात आली. शिवसेनेचे निलेश कुंभार यांना 7 हजार 949 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजय सलागरे यांना 4 हजार 073 मते मिळून निलेश कुंभार यांना आतापर्यंतचे सर्वाधिक 3 हजार 876 मताधिक्य मिळाले आहे. या गटामध्ये नोटा बटनावर 106मते पडली आहेत.
115 माटवण पं.स.गणात 9 हजार 957 पैकी 5 हजार 574 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. शेकाप व शिवसेना युतीच्या शेकाप उमेदवार साक्षी कांबळेकर यांनी 3 हजार 335 मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हर्षदा वरवाटकर यांना 2124 मते यांचा तब्बल 1 हजार 211 मताधिक्याने पराभव केला. येथे नोटावर 134 मते आणि 1 मत अवैध ठरले.
116 कापडे बुद्रुक पं.स.गणात 10 हजार 490 मतदारांपैकी 6 हजार 515 मतदान झाले. मागीलवेळी पराभूत झालेले शिवसेनेचे अनिल दळवी यांनी 4 हजार 425 मते मिळवून 2 हजार 4 मते मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल मालुसरे यांचा 2 हजार 421 मताधिक्याने पराभव केला. या गणात नोटा 106 बटनावर तर 2 मते अवैध ठरली आहेत.
शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे यांचा विजयी चौकार; विरोधक गारद
59 लोहारे जि.प. गटात 18 हजार 795 एकूण मतदानापैकी पोस्टल 38 मतांसह 12 हजार 729 मतदान झाले. आतापर्यंत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या या जिल्हा परिषद गटातील निवडणुकीमध्ये चंद्रकांत कळंबे यांनी 7 हजार 255 मते मिळवित 5 हजार 169 मते मिळविणारे भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार कृष्णा कदम यांचा 2 हजार 86 मताधिक्य घेत दारूण पराभव केला. या निवडणुकीत चंद्रकांत कळंबे यांनी विरोधकांच्या टीकेला खुलासा करणे टाळून टीकेने उत्तर दिल्याने निवडणूक हायव्होल्टेज ड्रामा झाली होती. मात्र, मतदारांनी साथ न सोडल्याने चंद्रकांत कळंबे यांनी विरोधकांना आणि ज्यांच्या टीकांना गारद केले. काँग्रेसचे अ.रझाक करबेलकर यांना 128 मते आणि अपक्ष कृष्णा कदम यांना 105 मते मिळाली. नोटा 71मते तर 1 अवैध मत झाले.
117 लोहारे पं.स.गणातील 8 हजार 326 एकूण मतदारांपैकी 5 हजार 769 मतदान झाले. शिवसेनेच्या अनिता अनिल भिलारे यांना 3 हजार 231 मते मिळून त्यांनी 2 हजार 439 मते मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युगज्ञा दीपक उतेकर यांचा 792 मताधिक्याने पराभव केला. येथे नोटा 108 मते तर अवैध 1 मत ठरले.
118 कोतवाल पं.स.गणात 10 हजार 469 मतदारांपैकी 6 हजार 950 मतदान झाले. शिवसेनेचे अविनाश शिंदे यांना 4 हजार 29 मते मिळून त्यांनी 2 हजार 808 मते मिळविणाऱ्या भाजपच्या सुरेंद्र चव्हाण यांचा 1 हजार 221 मतांनी पराभव केला. या गणात नोटा 113मते पडली.
पोलादपूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेसह शेकापक्षानेही हा घवघवीत विजय मोठया हर्षोल्हासात साजरा केला. पेट्रोलपंप भागातील शिवसेनेच्या गोटात एकीकडे प्रत्येक निकालाच्या घोषणेनंतर आनंदाचे वातारण निर्माण होऊन गर्दी वाढू लागली तर पोलीस स्टेशन भागातील भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील कार्यकर्ते हळूहळू पांगल्याने संपूर्ण निवडणूक निकाल परिसरात शिवसेना शेकापचा विजयी जल्लोषाने ताबा घेतला.