स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त एसबीआय माणगाव शाखेत तिरंग्याच्या साक्षीने देशभक्ती, उत्साह आणि राष्ट्रीय अभिमानाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. आकर्षक तिरंगा सजावटीने सजलेला बँक परिसर, उत्साहात सहभागी झालेले कर्मचारी आणि चिमुकल्या भगिनींच्या लाठी-काठीच्या प्रभावी सादरीकरणामुळे स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष रंगत आली.
एसबीआय माणगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक सुशील भसमे यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाचे दिमाखदार ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्याचे महत्त्व, देशभक्ती आणि प्रत्येक नागरिकाची राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.
सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते शालेय विद्यार्थिनी कार्तिकी वृशाली किरण मोरे (इयत्ता ५वी) आणि तिची धाकटी बहीण वैष्णवी वृशाली किरण मोरे (इयत्ता २री) यांनी सादर केलेले लाठी-काठीचे आत्मसंरक्षण प्रात्यक्षिक. दोन्ही भगिनींनी आत्मविश्वास, चपळता आणि कौशल्याचे दर्शन घडवत प्रभावीपणे सादरीकरण केले. त्यांच्या या प्रात्यक्षिकाला उपस्थित बँक कर्मचारी आणि मान्यवरांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त दाद दिली.
या कौतुकास्पद सादरीकरणाची दखल घेत शाखा व्यवस्थापक सुशील भसमे यांनी कार्तिकी आणि वैष्णवी या दोन्ही भगिनींचा भेटवस्तू देऊन गौरव केला. त्यांच्या या कृतीमुळे विद्यार्थिनींच्या कलागुणांना तसेच आत्मसंरक्षणाच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळाले.
दरम्यान, एसबीआय माणगाव शाखेने स्थानिक आघाडीच्या वृत्तपत्रांमधून ’80 वा स्वातंत्र्य दिनाच्या’ विशेष शुभेच्छा प्रसिद्ध करून रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या माध्यमातून बँकेने जिल्ह्यातील नागरिकांशी आपला सामाजिक आणि आत्मीयतेचा स्नेहबंधही अधोरेखित केला.
बँक परिसरातील आकर्षक तिरंगा सजावट, राष्ट्रध्वजाला मानवंदना आणि देशभक्तीपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसर स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवी रंगात न्हाऊन निघाला होता. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.
तिरंग्याच्या अभिमानासोबतच चिमुकल्या भगिनींच्या लाठी-काठीच्या थरारक सादरीकरणाने एसबीआय माणगाव शाखेतील स्वातंत्र्यदिन सोहळ्याची रंगत आणखी वाढवली. देशभक्ती, कौशल्याला प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकीचा सुरेख मेळ साधणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.