चौक बाजारपेठ रस्त्याला स्वातंत्र्यवीर स्व.विश्वनाथ रामचंद्र ठाकरे यांचे नाव

चौक | अर्जुन कदम
भारतीय स्वातंत्र्यवीर स्व.विश्वनाथ रामचंद्र ठाकरे यांचे नाव चौक बाजार पेठ येथील रस्त्याला देऊन ग्राम पंचायत चौक यांनी त्यांना आदरांजली अर्पण करून एका सेनानी चा गौरव केला आहे.
१९४२ चा लढा म्हणजेच भारत छोडो  आंदोलन होय. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानात महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध अखेरचा निर्णायक लढा पुकारत करा किंवा मरा हा मंत्र दिला होता. महागाई व ब्रिटिश राजवटीबद्दल तीव्र झालेला भ्रमनिरास यामुळे हा लढा संपूर्ण देशात पसरला होता. ९ ऑगस्टच्या पहाटेच गांधीजींसह सर्व प्रमुख काँग्रेस नेत्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात डांबले होते.केंद्रीय नेतृत्व नसल्यामुळे हा लढा पूर्णपणे तळागाळातील जनतेने, विद्यार्थ्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वतः हाती घेतला होता, त्यातच पनवेल येथील उरण पुलावर रायगड जिल्ह्यातील काहीनी या लढ्यात सहभाग घेऊन ब्रिटीशांना पळता भुई थोडी केली होती. त्यात रायगड जिल्ह्यातील चौक या ऐतिहासिक गावातील विश्वनाथ रामचंद्र ठाकरे यांनीही लढ्यात सहभाग घेतला होता, ब्रिटीश सरकारने त्यांना तुरुंगात टाकले व माफी मागण्यास सांगितले, पण त्यांनी माफी न मागितल्याने त्यांना कारावास झाला.ताबडतोब स्वातंत्र्य मिळाले नसले तरी या आंदोलनाने ब्रिटिशांची पायाळू सत्ता हादरवून सोडली.
भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग यामुळे सुकर झाला आणि हा लढा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक सुवर्णकाळ ठरला. स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्यवीर स्व. विश्वनाथ रामचंद्र ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनी चौक बाजारपेठ येथील रस्त्याला त्यांचे नाव देऊन त्याचे नामकरण सरपंच रितू ठोंबरे, उप सरपंच नैना झिंगे, ग्राम पंचायत अधिकारी गणेश मोरे, ठाकरे कुटुंबातील विजय ठाकरे, राजेंद्र ठाकरे, श्याम ठाकरे त्यांचा परिवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ग्राम पंचायत सदस्य,व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.