Raigad: जिल्ह्यात तापमानात वाढ; असा करा उष्माघातपासून बचाव

Temp
अलिबाग:
प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्याकडून रायगड जिल्ह्यात ६ मार्च ते १० मार्च २०२५ दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उन्हाळ्याचा विचार करता, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांच्याकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी हे करा:
पुरेसे पाणी प्या: तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने थोडे थोडे पाणी प्या.
डोके झाका: घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
दुपारी घराबाहेर जाणे टाळा: विशेषतः दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान उन्हात जाणे शक्यतो टाळावे.
सुती कपडे वापरा: हलके, पातळ आणि सच्छिद्र कपडे परिधान करावेत.
थंड पेये: लिंबू पाणी, ताक, कैरीचे पन्हे, ओआरएस इत्यादी द्रव्यांचे सेवन करा.
शरीर थंड ठेवा: वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा आणि ओले कपडे वापरा.
प्रवासात पाणी सोबत ठेवा: बाहेर जाताना पिण्याचे पाणी बरोबर घेऊन जा.
गुरांची काळजी घ्या: त्यांना पुरेसे पाणी व सावलीत विश्रांती मिळेल याची काळजी घ्या.
हे टाळा:
अति श्रमाची कामे करू नका: उन्हात जड कामे करणे टाळावे.
दारू आणि गरम पेये टाळा: चहा, कॉफी आणि गोडसर थंड पेये याचा वापर कमी करावा.
गडद आणि घट्ट कपडे टाळा: अशा कपड्यांमुळे उष्णता वाढू शकते.
लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना वाहनात एकटे सोडू नका: पार्क केलेल्या गाडीत त्यांना ठेऊ नये.
दुपारी स्वयंपाक टाळा: शक्य असल्यास दुपारच्या वेळी स्वयंपाक टाळावा आणि हवेशीर खोलीत काम करावे.
उष्णतेचा झटका आल्यास काय करावे?
अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे, किंवा सतत घाम येणे ही उष्णतेच्या झटक्याची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रुग्णास थंड हवेत विश्रांती द्या.
गरोदर स्त्रिया, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
जिल्ह्यातील नागरिकांनी या सूचनांचे पालन करून स्वतःचे आणि आपल्या परिवाराचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,रायगड संदेश शिर्के यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *