PEN : प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण, सात वर्ष मोबदल्यापासून वंचित !

Pen Uposhan
पेण (राजेश प्रधान) :
रायगड जिल्ह्यातील नागोठणे ते गुजरात मधील दहेज पर्यंत महाराष्ट्र ते गुजरात राज्याना जोडणारा रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पाकरीता शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनीचा पूर्ण मोबदला नुकसान भरपाई आजपर्यंत शेतकऱ्यांना न मिळाल्याने संतापलेल्या बळीराजांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू केले आहे.
रिलायन्स कंपनीने नागोठणे ते दहेज  इथेन गॅस पाइपलाइन प्रकल्पा करीता २०१७ साली जमिनी अधिग्रहण केल्या. याकरिता पेण तालुक्यातील ६०.१७ हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात आली या जमिनीतून २२.४१ किलोमीटर लांब गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. सात वर्षानंतरही पेण तालुक्यातील १४८ शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपल्या हक्काचा मोबदला मिळवण्यासाठी पेण तालुक्यातील प्रकल्प बाधीत शेतकरी संघटने शेतकरी संघटनेच्या नेत्या कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात २० फेब्रुवारी पासून कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत घासे, विजय लांगी, मिना पाटील, संदीप सूर्वे, नामदेव पाटील यांच्या सह प्रकल्पबाधीत शेतकरी उपोषणास बसले आहेत.
मोबदला देताना पक्षपातीपणा
रिलायन्स कंपनीने गॅस पाईपलाईन टाकण्याकरिता शेतकऱ्यांची आधीग्रहण केलेल्या जमिनीचा मोबदला देताना पक्षपातीपणा केल्याने काही शेतकऱ्यांना पाच लाख तर काही शेतकऱ्यांना सात लाख प्रति गुंठा मोबदला देण्यात आला. या जमिनींचे पुन्हा २०१९ साली फेरपंचनामे करण्यात आले व सर्वांना समान मोबदला देण्याच्या आदेश तत्कालीन सक्षम अधिकारी पांडुरंग मगदूम यांनी दिले होते तरीही अद्याप शेतकरी हक्काच्या मोबदल्यापासून वंचित आहेत.
मोबदला मिळेपर्यंत उपोषण मागे नाही
रिलायन्स कंपनीने अधिग्रहण केलेल्या जमिनीचा समान मोबदल, पिकांची व बांधबंदिस्ती नुकसान भरपाई, शेतकरी बांधवांच्या हक्काची शेष शिल्लक रक्कम कंपनी देण्याबाबत वेळोवेळी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. आमच्या हक्काचा मोबदला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरुच ठेऊ. आमच्या जीविताची संपूर्ण जबाबदारी रिलायन्स कंपनी व शासनाची राहील. मागण्या पूर्ण न झाल्यास गॅस पाईपलाईन उखडून टाकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यां शेतकरी नेत्या कल्पना पाटील यांनी दिला.
कंपनी प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
कंपनीने अधिग्रहण केलेल्या जमीनीचे मूल्यांकनानूसार शेतकऱ्यांना दिलेली रक्कम व उरलेली शेष रक्कम मिळणे कामी नऊ वेळा आंदोलने झाली,  आजचे हे दहावे आंदोलन सुरु केले आहे. या अगोदर गेल्या पाच वर्षांत मुंबई आझाद मैदानावर २वेळा, रायगड जिल्हा अधिकारी कार्यालय अलिबाग ३ वेळा पेण प्रांत अधिकारी कार्यालयावर ४वेळा असा या प्रकल्पाबाबत आंदोलने झाली. शासन स्तरावर  दि,२१/१२/२०१८ रोजी रायगचे तत्कालीन पालकांनी रविंद्र चव्हाण यांचे लेखी आदेश, दिनांक १/७/२०१८ रोजी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठकीत दिलेला निर्णय यानुसार सक्षम  प्राधिकरण प्रकल्प अधिकारी यांचे शासनाला पत्र , दिनांक ३१/१०२०२२ रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात याबाबत दिलेले निर्देश   दिनांक २४/३/२०२४रोजी विधीमंडळ अधिवेशनात विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना क्रमांक -५६ आणि दि,८/१२/२०२३ नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना क्रमांक १६६४ अशा प्रकारे सतत पाठपुरावा करुन देखील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला देण्यास रिलायन्स कंपनी इथेन गॅस पाइपलाइन प्रकल्प अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.
शेतकरी आक्रमक
बुधवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी कंपनीचे अधिकारी किशोर लैला, सक्षम अधिकारी अनिल सावंत यांच्या समवेत उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली पण आलेल्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले परंतु यावेळी अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांचा निषेध करत घोषणाबाजी केली. अखेर अधिकारी वर्गाने काढता पाय घेतला. गुरुवारी  उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार बोलून दाखविला.
Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *