Mahad Flood : प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; महाड शहरात पूरस्थिती

Mahad Bajar Peth Poor

गाळ काढून देखील शहरातील सखल भागात पाणी शिरलेच!

महाड  ( मिलिंद माने ) :

मागील २४ तासापासून महाड परिसरात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सावित्री, काळ गांधारी, नागेश्वरी या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत शेजारील दादली, शिरगाव, वडवली, राजेवाडी, मुठवली, केभुर्ली, लाडवली ,आचळोली, मोहपरे ,नाते या ठिकाणी ात शेतीमध्ये आणि महाड शहरातील सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामुळे नदीकिनारी असलेल्या रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सखल भागामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने नगर परिषदेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केले मी आहे. मात्र पाण्याची पातळी भरती मुळे सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महाड शहरातील सावित्री नदी किनाऱ्यावर असलेल्या भोईघाट येथील महिकावती मंदिराजवळ नदीतील पाण्याची पातळी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ७.१० मीटर पेक्षा जास्त नोंदविण्यात आली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने शहरातील दस्तुरी नाका, मच्छी मार्केट या परिसरात पुराचे पाणी शिरले असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन नगरपरिषद व स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आले. महाडसह पोलादपूर व महाबळेश्वर, महाड तालुक्यातील मांगरुण, वाळण, पाने, पंधेरी या गावाच्या परिसरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली असल्याने महाड शहरातील सखल परिसरात आलेल्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाड तालुक्याच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मागील दोन दिवस मुसळधार पावसामुळे वरंधा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. पुण्याकडे जाणाऱ्या ताम्हिणी घाटातील मुळशी नजीक दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. येत्या आठ ते दहा तासांमध्ये वाहतुकीला मार्ग सुरू करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर महाड तालुक्यातील चोचिंदे, मुठवली, सव, गोठे, रावढळ, तुडील, जुई, कुंबळे, बेबलघर, चिंबावे, तेलंगे, रोहन , वलंग, ओवळे या गावाच्या परिसरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. किल्ले रायगड मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले असून या परिसरात देखील काही सखल भागात रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग देखील बंद झाला आहे.
किल्ले रायगड परिसरातील सुमारे २५ पेक्षा अधिक गावांचा संपर्क किल्ले रायगड मार्गावर दरड कोसळल्याने या भागातील नागरिकांचा संपर्क तालुक्याशी तुटला आहे. आज सकाळी मच्छी मार्केट त्याचबरोबर गाडीतळ परिसरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर कसबे शिवतर गावापासून उंच डोंगरावर असलेल्या सह्याद्री वाडीकडे जाणारा रस्त्यावरील पादचारी पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला आहे तर महाड जवळील दादली येथील काशीराम गायकवाड यांच्या घराच्या पत्र्यावर मातीचा भराव आल्याने घराचे छत कोसळले आहे. मात्र जीवित हानी टळली आहे तर पडवी पठार वाडीतील बापूरावजी शिंदे यांच्या घराची भिंत पावसामुळे पडली आहे त्याचबरोबर विन्हेरे येथील जितेंद्र माने यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *